Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना तालुकास्तरीय यंत्रणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. 24 - कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी संवाद साधला. ज्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होत आहे, ती रोखा. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे, त्याची अंमलबजावणी करा, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या व्यक्ती कोरोना संसर्ग चाचणीत निगेटीव आल्या आहेत, मात्र त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर आरोग्य आणि पोलीस यंत्रणेमार्फत दैनंदिन लक्ष ठेवण्यात यावे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु आहेत, मात्र, नागरिकांनी अशा दुकानांवर अनावश्यक गर्दी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, जिल्ह्यातील भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात येणार असून फिरुन भाजीपाला विक्रीस परवानगी असणार आहे,

जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
सध्या बाहेरील जिल्ह्यातील मालवाहतूक वगळता बाकीच्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हा किंवा शहर सीमेवर जे चेक पोस्ट ठेवण्यात आले आहेत, तेथे बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍या वाहनांना प्रतिबंधित करण्यात यावे, त्याची कडक अंमलबजावणी व्हावी. आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. जे फेरीवाले भाजी विक्री करत आहेत, त्यांची अडवणूक केली जात नाही, मात्र, जे एका ठिकाणी बसून गर्दी वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत, त्यांना तात्काळ प्रतिबंध करण्यात यावा. बाहेरील विशेषत: मुंबई आणि पुण्याहून जे नागरिक आपापल्या शहरात यापूर्वी आले आहेत, त्यांची माहिती घेऊन त्यांना घरीच देखरेखीसाठी ठेवण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सर्व अधिकारी-कर्मचारी आणि या आपत्कालिन परिस्थितीत काम करणार्‍या सर्व यंत्रणांनी स्वताच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही श्री. द्विवेदी यांनी दिला. स्थानिक पातळीवर तेथील परिस्थितीच्या अनुरुप काही निर्णय घ्यावे लागत असतील, तर ते घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.
सध्या सोशल डिस्टन्सिंग खूप महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, त्याची अंमलबजावणी केली जावी. नागरिकांना त्रास होणार नाही, मात्र विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.   

Post a Comment

0 Comments