Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सात व्यक्तींचा 'कोरोना संसर्ग' अहवाल निगेटीव


आतापर्यंत 37 व्यक्तींवर औषधोपचारानंतर घरीच देखरेख, आज आणखी 14 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. 18 - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हा एकवटला असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना जिल्हावासियांनीही प्रतिसाद दिल्याने हा धोका आपण टाळू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. महत्वाच्या संस्था, देवस्थाने, आस्थापना यांनी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने तेथील गर्दी ओसरली आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाली तर हा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी आज 07 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. अजून 06 व्यक्तींचा नमुना अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 42 व्यक्तींची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली असून त्यापैकी 37 जणांना त्यांची नमुना चाचणी निगेटीव आल्याने घरी सोडण्यात आले असून त्यांना तेथे घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आज आणखी 14 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणार्‍यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल, असे श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आज जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे आणि इतर वैद्यकीय अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. कोरोना प्रादुर्भाव उपाययोजनांसंदर्भात त्यांनी चर्चा करुन संबंधितांना सूचना दिल्या.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हयातील लोकप्रतिनिधींनीही जाहीर कार्यक्रम टाळून जिल्हावासीयांना एकप्रकारे गर्दी टाळण्याचा सकारात्मक संदेश दिला आहे. याशिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा. आवश्यकता असेल तरच बाहेर पडा, असा सल्लाही जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिला. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, मात्र स्वताची काळजी घ्यावी. थेट संपर्क टाळावा तसेच हात वारंवार साबणाने धुवावेत. आजाराची लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणार्‍याविरोधात जिल्हा पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. 
चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरिया, दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करून घ्यावी, तसेच या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
ज्या ज्या व्यक्तींना त्यांचे अहवाल निगेटीव आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, त्या व्यक्तींच्या हातावर 'होम क्वारंटाईन' असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना 14 दिवस कोणाच्या संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनीही स्वताच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.                  

Post a Comment

0 Comments