Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परदेशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घ्यावी - जिल्हाधिकारी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटरर्सनीही याबाबत माहिती देण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. 13 - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा अद्याप जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, जे नागरिक परदेशातून आले आहेत, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी गेलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटरर्सनीही त्यांच्या स्तरावर या नागरिकांना आवाहन करावे आणि त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. आरोग्य यंत्रणानी अशी माहिती आल्यास संबंधितांची तपासणी करेल, असे ते म्हणाले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात यापूर्वीच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने सकारात्मक पावले उचलली आहेत. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटरर्स तसेच चित्रपटगृहांचे मालक-व्यवस्थापक यांची बैठक घेऊन यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सना कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच परदेशातून या विषाणूचा शिरकाव देशात झाल्यामुळे परदेशातून येणार्‍या तसेच परदेशात सहलीसाठी गेलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  त्यामुळे जिल्ह्यात परत आल्यानंतर अशा नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. यादृष्टीने अशा सहली आयोजित करणार्‍या कंपन्यांनी किंवा ऑपरेटर्सनी ती नावे जिल्हा प्रशासनाकडे कळवावीत. तसेच त्यांच्या पातळीवरुनही संबंधितांना आरोग्य तपासणी करण्याबाबत अवगत करावे, अशा सूचना दिल्या.
  सध्या दुबईहून आलेल्या ४ जणांचे नमुने पुण्यात चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास या विषाणूची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीही तपासणी करण्यात आली असून त्यांच्यातही अशी लक्षणे आढळली नाहीत, तसेच, असे कोणी नागरिक बाहेरुन आले असतील तर त्यांनीही स्वताची आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी सांगितले
   सोशल मीडियाच्या माध्यमातून करोना विषाणू संदर्भात कोणत्याही प्रकारची अर्धवट, खोटी, चुकीची आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणार्‍यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने नागरिकांनी काळजीचे कारण नाही, असे ते म्हणाले.
  जिल्ह्यात पूर्वकाळजी म्हणून सर्व प्रकारचे शासकीय कार्यक्रम व मेळावे रद्द करण्यात आले आहेत. सर्व यात्रा-जत्रा तसेच विविध मोठ्या स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करणार्‍या संयोजकांनी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत आणि नागरिकांनीही अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
    चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या आरोग्य सुविधेसाठी संबंधित परिसर हा स्वच्छ ठेवावा, तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी चित्रपटगृहचालकांना दिल्या.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपण जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थानचे हॉस्पिटल आणि शनि शिंगणापूर येथील देवस्थानचे हॉस्पिटल येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी स्वताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे.
करोना आजार होऊ नये यासाठी श्वसनसंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. हात नियमितपणे साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धूता खाऊ नयेत. हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गरज नसताना गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा, नियमबध्द जीवनशैलीचा अवलंब करा. स्वत:हून कोणताही उपचार करु नये, डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच उपचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्वसनास त्रास होणा-या व्यक्ती आणि हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास, प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे. अशा व्यक्तींनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करुन घ्यावेत, असे श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
करोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री १०४ क्रमांक करोना विषयक  शंकासमाधानासाठी उपलब्‍ध करण्‍यात आला आहे.  याशिवाय  जिल्‍हा  सामान्‍य रुग्‍णालय, अहमदनगर येथे करोना नियंत्रण कक्ष स्थापन ( 0241-2431018 ) करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा 1077 या टोल फ्री क्रमांकालवरुन नागरिकांना मूलभूत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्स  तसेच चित्रपटगृहांचे मालक-व्यवस्थापक उपस्थित होते.

                                                

Post a Comment

0 Comments