Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी देणार - उपमुख्यमंत्री पवार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी तसेच येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते याच्या पायाभूत विकासासाठी आवश्यक भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे आयोजित महाराजस्‍व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान योजना, सृजन शासकीय योजना शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आ. सुधीर तांबे, आ.लहू कानडे, शिबिराचे आयोजक आ. रोहित पवार, जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, मंजुषा गुंड, बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, माजी आमदार राहुल जगताप, समाज कल्याण सभापती उमेश परहर, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, राजेंद्र फाळके आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री पवार म्हणाले की, नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न निश्‍चितपणे केला जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सर्व करण्याचा आणि त्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द तुम्हाला देतो, अशा शब्दात पवार यांनी कर्जत-जामखेड करांना आश्वस्त केले. मागील सरकारचा काळात प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यात तुकाई चारी, कुकडी चारीचे काम, पिण्याच्या पाण्याच्या योजना, चौंडी तीर्थक्षेत्र विकासाला चालना यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कर्जत आणि जामखेड येथे अद्ययावत बसस्थानकासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, बेरोजगार युवक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक कायदा आपण करणार आहोत. पोलिसांनीही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश श्री. पवार यांनी दिले.
ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी नियोजन मंडळाच्या निधीतून वाढीव निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी आमदार रोहित पवार करीत असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुररावा कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात आमदार पवार यांनी शिबिराचे आयोजन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. या शिबिराच्या माध्यमातून माहि जळगाव, जामखेड तालुक्यातील खर्डामंडळातील गावे आणि कर्जत शहर येथील 42 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याचे ते म्हणाले. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कार्यरत असणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, संबंधित मंडळातील कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच यांचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार, पालकमंत्री श्री. मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री श्री. तनपुरे, जि.प. अध्यक्षा राजश्री घुले, आ. तांबे, आ. कानडे यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, योजनेच्या लाभाचे पत्र प्रदान करण्यात आले. कर्जत-जामखेड तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सत्कार श्री.पवार आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या महाराजस्व अभियान प्रसंगी महसूल, सामाजिक वनीकरण,परिवहन, कृषी,आरोग्य शिक्षण, भुमिअभिलेख यासह विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. तेथे विविध नागरिकांना योजनांची माहिती तसेच लाभासाठी पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत होता. या स्टॉल्सची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. पवार, पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि मान्यवरांनी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या शिबिरासाठी विविध विभागांचे अधिकारी, मतदारसंघातील विविध गावातील पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments