Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाच दिवसाचा आठवडा निर्णयाचे स्वागत ; सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्याने सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ आज येथील राजपत्रित अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी घेतली. पाच दिवसांचा आठवडा केल्याने अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याचे वचन आज या अधिकारी व कर्मचारी यांनी घेतले.
      जिल्हाधिकारी कार्यालय येथील प्रियदर्शिनी सभागृहात हा कार्यक्रम झाला. राजपत्रित अधिकारी महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, राज्य कार्यकारिणीचे जनसंवाद संघटन सचिव, विठ्ठलराव गुंजाळ, कोषाध्यक्ष तथा कोषागार अधिकारी महेश घोडके, महासंघाच्या दुर्गा मंचच्या जिल्हाध्यक्षा तथा तहसीलदार वैशाली आव्हाड, उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, तहसीलदार श्री. घोरपडे आदींसह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी श्री. किसवे यांनी सर्वांना पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे वाढलेल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली. ही जबाबदारी प्रत्येकाने कर्तव्यभावनेने आणि नागरिकांप्रती आपुलकी ठेवून पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
            श्री. गुंजाळ यांनी राज्य शासनाकडे पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी महासंघाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्य शासनाने अधिकारी-कर्मचारी यांची मागणी मान्य करुन एक चांगला निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्याप्रती हे राज्य शासन सकारात्मक आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचीही नागरिकांप्रती चांगली सेवा देणे ही जबाबदारी आहे. त्याकामासाठी आपण सारे वचनबद्ध होऊ, असे त्यांनी सांगितले.   श्री. घोडके यांनी, कामांची जबाबदारी  ओळखून वेळेचे नियोजन करुन प्रत्येकाने काम करावे, असे सांगितले. राज्य शासनाकडे गेली अनेक वर्षे या व अन्य मागण्यांसाठी पाठपुरावा सुरु होता. त्यापैकी  एक महत्वाची मागणी मान्य झाल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाघिकारी श्री. किसवे यांनी वचनबद्धतेची शपथ दिली. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे अथक प्रयत्नशील राहून कार्यालयीन कामाच्या वेळेत नागरिकांची कामे अधिक वेगाने आणि सकारात्मकदृष्टीने करु. अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा अथवा सुट्टया यामुळे नागरिकांच्या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. आमची ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्साह याद्वारे वैभवशाली महाराष्ट्राच्या उभारणीसाठी वचनबद्ध राहू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

                                                          


Post a Comment

0 Comments