Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पात्र लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद सायेब, फक्त अंगठा दिला अन् काम झालं!


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेने मुख्यमंत्री म्हणाले, हे तर आशीर्वाद!

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.24 - 'सायेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं. अगदी सुटसुटीत आहे!,' राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांची ही भावना. त्यांनी आज ती थेटपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली आणि या दोघांनीही, ही भावना म्हणजे या सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा आणि हे आशीर्वाद कायम असू द्या, असे त्यांना सांगितले.


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात आज झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थीं यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकर्यां ना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुपारी एक वाजता या संवादास सुरुवात केली. राज्यात कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले...अशी विचारणा केली. त्यावर पोपटरावांनी ऊसासाठी २८ हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ होणार असल्याने अतिशय आनंद आहे. प्रशासन आणि सरकारचं खरोखरंच आभार, असे त्यांनी सांगितले. 
पोपटरावांनी आभार मानताच मु्ख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आभार कसले... हे तर कर्तव्यच असल्याचे सांगितले आणि तुमचे आभाराचे शब्द म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. 
बळीराजाला दुखावू नका, त्यांची कामे वेळेत पूर्ण करा. आपण ही योजना आणलीय. ती कमी वेळेत पूर्ण करण्याचे श्रेय प्रशासनाला जाते, असे कौतुकोद्गारही काढले. 
या संवादासाठी ब्राह्मणी येथील उषाबाई हापसे, मीराबाई हापसे, गणपत जाधव, पोपट मोकाटे, संतोष ठुबे, दिलीप तारडे, राजेंद्र बानकर, पंढरीनाथ बानकर, पोपट ठुबे, भास्कर ठुबे हे पात्र शेतकरी तर जखणगाव येथील रामचंद्र जाधव, बाळू वाळके, पंकज पवार, बंडू वाळके, छाया पवार, अशोक भिसे, विष्णू कर्डिले, बेबी कर्डिले, उमराव शेख, विठ्ठल वाळके आदी उपस्थित होते. 
या कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया जलदगतीने मार्गी लागावी, यासाठी स्वत: जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्वीजय आहेर, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, सहकार विभागाचे तालुका सहनिबंधक, गटसचिव, तलाठी, बॅंकांचे अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. 
ब्राह्मणी व जखणगाव या दोन गावांच्या यादी प्रसिद्धीकरण, आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित तहसीलदार एफ. आर. शेख आणि उमेश पाटील तसेच सहकार विभागाच्या अधिकार्यांसनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यामुळेच दोन्ही गावांतही पहिल्याच दिवशी ९७२ खातेदारांपैकी जवळपास ५० टक्के आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्णही झाले होते.

Post a Comment

0 Comments