Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर !

नागरिकांसाठी अँड्रॉईड अ‍ॅपची निर्मिती
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने अँड्राईड अ‍ॅप महापालिकेने तयार केले असून, लवकरच हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
महापालिकेचे अपुरे कर्मचारी, कचरा संकलनासाठी अपुरी यंत्रणा यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने कचरा संकलन व वाहतुकीचे खासगीकरण केले आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट या अनुभवी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कचरा संकलनाच्या प्रक्रियेत सुसूत्रता येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अद्यापही घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी काही भागातून येत आहेत. कचरा संकलन करणार्‍या वाहनांना रोडमॅप तयार करुन देण्यात आलेला आहे. या वाहनांना जीपीएस लावण्यात आले असून, त्याचे नियंत्रणही मोबाईल अ‍ॅपवरुन केले जात आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी व नागरिकांना त्यांच्या घराच्या परिसरात घंटागाडी आल्याची माहिती मिळावी, यासाठी आता उपाययोजना केल्या जात आहेत.
महापालिकेकडून नव्याने मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून, यामध्यमातून नागरिकांना नोटिफिकेशनद्वारे त्यांच्या परिसरात घंटागाडी आल्याची माहिती मिळणार आहे. मोबाईल अ‍ॅपवर तांत्रिक माहिती, रोडमॅप आदींबाबत पूर्तता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण होताच हे अ‍ॅप नागरिकांसाठी खुले होणार आहे. अँड्रॉईड मोबाईलवर हे अ‍ॅप वापरता येणार असून, त्यासाठी नागरिकांना स्वतःच्या घराचे लोकेशन सेट करावे लागणार आहे. तसेच नागरिकाचे नाव, मोबाईल नंबर टाकून ‘केवायसी’ प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्याची माहिती अ‍ॅपवर संग्रहीत होणार आहे. नागरिकाने दिलेल्या लोकेशनच्या परिसरात घंटागाडी आल्यावर संबंधित नागरिकाला मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून गाडी आल्याची माहिती मिळणार आहे. किती अंतरावर गाडी आल्यावर माहिती हवी आहे, याची सुविधाही अ‍ॅपवर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू मनपाकडून सुरू आहे.
नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधांचा प्रयत्न*
शहरातील कचर्‍याची समस्या मार्गी लावण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. घंटागाड्यांची संख्याही आवश्यकतेनुसार वाढविली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता तो कचरा संकलन करणार्‍या वाहनातच टाकावा, असे आवाहन मनपाकडून करण्यात येत आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून गाडीची माहिती मिळणार आहेच. शिवाय घंटागाडी न आल्यास या अ‍ॅपवरुन तक्रारही करता येणार आहे. तशी सुविधाही अ‍ॅपमध्ये देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments