6 महिन्याच्या बालकासह महिला गंभीर जखमी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर ः शहरातील एका उद्योजकाने शेताच्या राखणीचे पैसे न देता गुंडामार्फत पारधी समाजाच्या महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना शेंडी (पोखर्डी) येथे घडली. यात सहा महिन्याचे बाळासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्या महिला व बाळास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार करुन जाळून टाकण्याची प्रकरण घडले असताना, दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात मागास समाजातील महिलांना दारूच्या नशेत गुंडांकडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महिला वर्गामध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर पारधी समाजाच्या महिला पोलिस ठाण्यात गेल्या असत्या, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. याबाबत पारधी समाजाच्या महिलांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मारहाण झालेल्या महिलेंशी संपर्क साधला असता, महिलांना मारहाण करताना एका महिलेस व मुलीस दारुच्या नशेत येऊन गुंडांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले. या गुंडांनी मारहाण करताना आमच्या 6 महिन्याच्या बालकासही सोडले नाही असे सांगितले.
शेंडी (पोखर्डी) येथील एका उद्योजकांच्या शेतामध्ये गेल्या 10 वर्षांपासून शेतराखणी व अन्य शेतातील कामे करत होतो. यापोटी प्रत्येकी 10 हजार रुपये महिना तोंडी ठरवून दिले होते. त्यामुळे गेल्या 12 महिन्यांचे 10 हजार रुपयांप्रमाणे पैसे व कुटुंबास राहण्यासाठी अर्धा गुंठा जागा मिळावी,अशी मागणी त्या उद्योजकांकडे केली आहे. ते पैसे मागितले तसेच राहण्यास जागा मागिलल्याने ते न देता त्यांनी आम्हाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली असे या महिलेने सांगितले. हा उद्योगपती न्यायालयात आमच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करून मानसिक व शारीरीक त्रास देत आहे. दमदाटी करून जेलमध्ये टाकण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्यात दिल्या आहेत.
0 Comments