Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दैत्यानांदूर खूनप्रकरणातील दुसऱ्या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून दोन गटात झालेल्या गोळीबार प्रकरणात दुसऱ्या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत दैत्यनांदूरचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांना बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. याबाबत गणेश दहिफळे यांनी शहादेव दहिफळे यांच्या सह इतरांवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल केला आहेे. आता मात्र दुसर्‍या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण गोळीबार केल्याचे फिर्यादी व खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी शहादेव दहिफळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
         याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील दैत्य नांदूर येथे १७ डिसेंबर रोजी राजकीय वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेतील गोळीबारात सरपंच संजय दहिफळे यांचा मृत्यू झाला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गणेश रमेश दहिफळे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता दुसऱ्या गटाकडून खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी शहादेव दहिफळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन फिर्यादीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोळीबार केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शहादेव दहिफळे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की भाऊ विष्णू दहिफळे हा संजय दहिफळे यांच्या पॅनेल विरुद्ध निवडणुकीत उभा होता व पराभूत झाला. दहा दिवसापूर्वी झालेल्या ग्रामसभेत विष्णू दहिफळे व संजय दहिफळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील मुंडे चौकात भाऊ विष्णु ओरडण्याचा आवाज आला. यावेळी सरपंच संजय दहिफळे व त्यांचे नातेवाईक भाऊ विष्णु यास काठ्या, कुर्‍हाडी, तलवारीने हाणमार करीत होते. संजय दहिफळे याने हातातील कट्टयाने ठार मारण्याची धमकी दिली.यावेळी आम्हाला समोरील लोक ठार मारतील या भीतीने मी घरी पळत जाऊन १७ बोरची बंदूक घेऊन आलो व गोळी झाडली ती सरपंच संजय दहिफळे यांना लागली त्यानंतर भाऊ-बहीण व इतर जखमींना उपचारासाठी घेवून जात असताना कोरडगाव जवळ गाडी रस्त्याच्या खाली जाऊन गाडीची मोडतोड झाली असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत शहादेव दहिफळे यांच्या जबाबावरून संजय बाबासाहेब दहिफळे ,ज्ञानेश्वर अशोक दहिफळे, बालू अशोक दहिफळे ,सुधिर अशोक दहिफळे, गणेश रमेश दहिफळे ,रमेश जिजाबा दहिफळे, भीमराव जिजाबा दहिफळे, विमल रमेश दहिफळे ,स्वप्नाली ज्ञानेश्वर दहिफळे व गणेश रमेश दहिफळे यांची पत्नी यांच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments