आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना बोगस कर्जप्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात डॉ. निलेश शेळके यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज जामीन फेटाळला. न्यायालयाच्या या आदेशामुळे डॉ. निलेश शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शहर बँकेच्या संचालकांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके यांनी अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने कर्ज प्रकरण करून घेत त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन महिलांसह एकूण तीन डॉक्टरांना प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल झाली आहे. डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. श्रीखंडे यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार डॉ. निलेश शेळके यांच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व अधिकार्यांविरुद्ध फसवणूक व आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान, बोगस कर्जप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेले डॉ. निलेश शेळके यांनी जिल्हा न्यायालयात याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे जामीन फेटाळला होता. यानंतर डॉ. निलेश शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली. तिथे जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने डॉ. निलेश शेळके यांचा जामीन फेटाळला. जामीन फेटाळत असताना उच्च न्यायालयाने डॉ. निलेश शेळके यांना यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
0 Comments