Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रामाणिकपणामुळे धनाजी जगदाळे यांंचा पोलीसांकडून सत्कार


आँँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पिंगळी बु.ता.माण येथील धनाजी यशवंत जगदाळे  (वय ५४) यांचे हातावरचे पोट रोज काम केले तरच कुटूंब चालेल अशी परिस्थिती.
दहिवडी आठवडा बाजार झाल्यावर हे उशिरा दहिवडी स्टँडवर आले. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्यांच्याकडे नव्हते.  गावातील ओळखीचेही त्या दरम्यान तिथे दिसत नव्हते. एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीची कोणी व्यक्ती कोणीच दिसेना. जायच कसं हा विचार करत दिवसभर कंटाळलेले धनाजी बसल्या जागेवर झोपून गेले. धनाजींना जाग आली तेव्हा अंधार पडला होता.
दरम्यान त्यांच्याजवळ ४० हजार रुपयेचे बंडल पडलेले दिसले. आपण ७ रूपये मिळतायत का बघत होतो पण आतातर ४० हजार रूपये सापडेलत.
चला निघून जावू ,आता गाडी भाडयाने करून जावू ,दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजींच्या मनात आला नाही. धनाजींनी आजूबाजूच्या सर्वाना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. शेवटी तो शोधाशोध करून स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसला.
खूप वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले, तेव्हा काही प्रवाशांनी आताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली. त्यांनी बसस्टँड पालथे घातले तेव्हा स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेले दिसून आले. त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचे सांगताच धनाजी बोलले किती रक्कम आहे ,नोटा कशा होत्या असे प्रश्न करीत ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी सर्व चौकशी करून घेतली. त्यावर ते ४० हजार रूपये आहेत .पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले असे त्याने सांगितले.
 धनाजींनी ते पैसे काढून देताच व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटला होता. त्यांनी बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजीला देवू केले. पण मनाने धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना. मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले.
तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितले की ते १ हजार ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी  ७ रुपये द्या. धनाजीचा प्रामाणिक आणि भाबडेपणामुळे माणसाच्या डोळ्यातून पाणी आले. ज्याला ४० हजार रूपये सापडूनही फक्त ७ रुपये प्रवासासाठी बक्षीस रूपाने घेणार हा देवदूतच म्हणावे लागेल ना.
परिस्थिती अनैकांना वाईट मार्गाने जायला लावते. पण चांगले काम करत परिस्थितीचा सामना करणारेही धनाजीसारखे धनवान व्यक्ती दिसून येतात. त्याच्या या कार्यामुळे धनाजी जगदाळेंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजी माझ्याच शेजारी बसून ही वस्तुस्तिथी सांगताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो याची प्रचिती आली.

Post a Comment

0 Comments