Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरला जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे पुन्हा रूजू


ऑनलाईन  न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे या शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी (दि.14)  क्रीडाधिकारी कार्यालयात हजर झाल्या. परंतु यावेळी कार्यालयात शिपाई सोडले तर अन्य कर्मचारी अचानक रजेवर गेले आहेत. तसेच कार्यालयातील कपाटे सील करण्यात आल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले. अनेक घडामोडीनंतर नगर जिल्ह्यास पुन्हा जिल्हा क्रीडाअधिकारी मिळाला असल्याने शहरातील सामाजिक संघटनांनी नावंदे यांचा यावेळी सत्कार करुन स्वागत केले. 
 अखेर सत्याचा विजय होतच असतो, त्यानुसारच मला पुन्हा जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून रूजू होण्याचे आदेश बुधवारी (दि.13) मिळाले, अशी प्रतिक्रिया दै.नगरी दवंडीशी बोलताना जिल्हा क्रीडाधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांना सांगितले. हे सांगताना त्यांना गहिवरून आले.
नावंदे पुढे म्हणाल्या की, मी स्वतःहून नगर जिल्ह्याचा क्रीडा कारभार आव्हान म्हणून स्वीकारले होते. त्यानुसार मी दुसर्‍यांदा पुन्हा नगर जिल्ह्याचा कारभार स्वीकारत आहे. मला नगर जिल्ह्यात खेलाडूंंसाठी काही तरी चांगले करायचे आहे. नगरच्या खेळाडूंना न्याय कसा मिळेल? संधी कशी मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. तो अधिकार नगरच्या जागृत मंचाने मला मिळवून दिला आहे. मी यापुढे जोमाने काम करणार असून, कोणतेही चुकीचे काम करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
 राज्याच्या क्रीडा विभागाकडे अहमदनगर क्रीडाधिकारी यांच्याबाबत जिल्ह्यातील क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षकांनी तक्रारी केल्या. त्या तक्रारीची दखल घेत, जिल्हा क्रीडाधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी नव्याने प्रभारी अधिकारी म्हणून विजय संताना (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  दरम्यान, या अन्यायकारक बदली विरोधात जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे या मॅटमध्ये गेल्या तर जागृत मंचाने मंत्रालय क्रीडा विभागात अपिल केले होते. त्या पार्श्वभूमीवर नावंदे यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे राज्याच्या क्रीडा विभागाचे मुख्य सचिव वंदना कृष्णा व आयुक्त सुधीर मोरे यांच्या आदेशाने कविता नावंदे यांना अहमदनगर जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून रूजू होण्याचे आदेश बुधवारी (दि.13) मिळाले. या आदेशानुसारच नावंदे या गुरुवारी (दि.14) सकाळी 11 वाजता अहमदनगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात रूजू होण्यासाठी गेेल्या होत्या. तत्पूर्वी कार्यालयातील काही शिपाई व अपवाद कर्मचारी सोडून अन्य सर्वच कर्मचारी व संबंधित जबाबदार अधिकारी हे मुख्य सचिव कृष्णा व आयुक्त मोरे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रजेवर गेले आहेत.
 अहमदनगर कार्यालयात हजर करून घेण्याच्या कागदपत्रावर सही करून संबंधित कर्मचारी व अधिकारी गैरहजर होते. नगर शहरातील क्रीडा विभागाची शिस्त न आवडल्याने व बेकायदेशीर गोष्टीमध्ये रस असणार्‍या क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षक यांनी राजकारणाचा दबाव आणून जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्याबाबत अन्यायकारक कारवाई झाली होती.  या नावंदे यांच्या कारवाईनंतरच्या काळात खर्‍या प्रामाणिक खेळाडूंची कुचबंना झालीच पण नुकसानही झाले आहे. ते पूर्वपदावर आणण्याचे आश्वासन यावेळी नावंदे यांनी दिले.
जिल्हा क्रीडाधिकारी येताच कपाटे सिलबंद...
कर्मचारी सोडले तर, अन्य कर्मचारी गैरहजर होतेच, परंतु कार्यालयातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे व फाईल ठेवण्यासाठीची सर्वच कपाटांना सिल करण्यात आल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले. याबाबत नावंदे यांच्याकडे विचारणा केली असता, आपणास त्याविषयी कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments