Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयपीएस अधिकारी अक्षय शिंदेसह चौघांना 3 लाख दंडाची नोटिस


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी तथा पोलिस मुख्यालय (गृह) विभागाचे पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह चौघांना नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी माहिती अधिकाराखालील अर्ज केलेल्या 12 प्रकरणांमध्ये 3 लाख रुपये संयुक्त दंडाची नोटिस बजावली आहे. पोलिस खात्यातील बडतर्फ कर्मचारी संजीव भास्कर पाटोळे यांनी माहिती अधिकारातील अपिलामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
संजीव पाटोळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती. या चौकशीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी अहवाल, कार्यालयीन टिप्पणी, चौकशी लिपिकाचे पद, नाव आदींची माहिती मिळण्यासाठी पोलिस मुख्यालय (गृह) यांच्याकडे दि.26 नोव्हेंबर 2017 रोजी अर्ज केला होता. या अर्जावर मुदतीत माहिती मिळाली नाही. त्यामुळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्याकडे दि.10 जानेवारी 2018 रोजी प्रथम अपिल दाखल केले. या अपिलाच्या सुनावणीमध्ये 7 दिवसांमध्ये माहिती देण्याचा आदेश दिला. त्यानंतरही माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्तांकडे द्वितीय अपिल दाखल करण्यात आले. या अर्जामधील आयुक्त बिष्णोई यांनी पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे आणि लिपिक गणेश होईफोडे यांना दोषी धरून 25 हजार रुपये दंड का आकारू नये, अशी नोटिस काढली आहे.
पाटोळे यांनी विभागीय चौकशी रद्द होण्यासाठी दि.24 नोव्हेंबर 2017 रोजी अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीची माहिती मागविली होती. ही माहिती वेळेत न मिळाल्याने राज्य आयुक्तांकडे द्वितीय अपिल दाखल केले. यामध्ये मुख्यालय उपअधीक्षक, अशोक परदेशी, गणेश डोईफोडे या तिघांना दोषी धरून दंडाची नोटिस काढण्यात आली. 
पोलिस मुख्यालयातील शौचालय आणि 32 निवासस्थाने नादुरुस्त असल्याबाबत पोलिस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला अहवाल दि.29 जून 2015 रोजी पाठविला होता. या अहवालाच्या अनुषंगाने माहिती अधिकारात दि.20 नोव्हेंबर 2017 रोजी माहिती मागविली होती. मुख्यालयाचे पोलिस उपअधीक्षक आणि लिपिकास दंडाची नोटिस काढली आहे.
पाटोळे यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे दि.6 सप्टेंबर 2017 रोजी अर्ज करून केला होता. त्याअनुषंगाने पोलिस मुख्यालय उपअधीक्षकांकडे कार्यालयीन टिप्पणी आणि जावक नंबरसह माहिती मागविली होती. या अर्जामध्ये उपअधीक्षक आणि गणेश डोईफोडे यांना दंडाची नोटिस काढण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचारी संजीव पाटोळे यांना खात्यातून बडतर्फ केले. त्यावर विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे अपिल दाखल केले. त्या अपिलावरील अभिप्राय आणि जावक क्र मांकाची माहिती मागविली होती. मुख्यालयाचे तत्कालिन पोलिस उपअधीक्षक, चौकशी लिपिक गणेश डोईफोडे यांना दोषी धरून दंडात्मक कारवाईसाठी नोटिस काढण्यात आली.
पाटोळे यांच्या विभागीय चौकशीच्या अनुषंगाने दि.12 सप्टेंबर 2017 रोजी अर्ज दिला होता. खोटी माहिती देणार्‍यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या अर्जावरील कारवाईची माहिती मागविली होती. ही माहिती विहित मुदतीमध्ये दिली नाही. या उलट प्रथम अपिलामध्ये विभागीय चौकशीच्या विरोधात मॅटमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामध्ये ही उपअधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह लिपिक गणेश डोईफोडे यांना दोषी धरून दंडाची नोटिस काढण्यात आली.
पोलिस मुख्यालयाचे तत्कालिन उपअधीक्षकांसह लिपिकांना सहा प्रकरणांमध्ये माहिती अधिकार कायद्याचे कलम 20(1) प्रत्येक प्रकरणांमध्ये संयुक्तपणे 25 हजार रुपये दंड का करू नये, याबाबत म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत. 
संजीव पाटोळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती. या चौकशीला उत्तर देण्यासाठी पाटोळे यांनी दि.28 नोव्हेंबर 2017 रोजी पोलिस उपअधीक्षक डॉ. अक्षय शिंदे (मुख्यालय) यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जातील माहिती न मिळाल्याने अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे दि.8 डिसेंबर 2017 रोजी अपिल दाखल केले होते. त्यानंतरही पाटोळे यांना माहिती मिळाली नसल्याने राज्य माहिती आयुक्तांकडे द्वितीय अपिल करण्यात आले.  या अर्जाबद्दल अशोक परदेशी आणि गणेश डोईफोडे या दोघांना दोषी धरण्यात आले असून त्यांना 25 हजार रुपये दंड का करू नये, अशी नोटिस काढण्यात आली.
  पाटोळे यांच्या माहिती अधिकारातील 12 प्रकरणांमध्ये विभागीय आयुक्तांनी प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची नोटीस काढली आहे. पोलिस उपअधीक्षकांना 6 प्रकरणांमध्ये लिपिकांसह संयुक्त दंडाची नोटीस काढली आहे. पोलिस मुख्यालयातील लिपिक गणेश डोईफोडेंना 9 प्रकरणांमध्ये तर तत्कालिन कार्यालय अधीक्षक अशोक परदेशी यांना 6 तर लिपिक चन्ना यांना 2 प्रकरणांमध्ये संयुक्त दंडासाठी दोषी धरून नोटिसा काढण्यात आल्या.
माहिती अधिकाराच्या अपिलामध्ये अर्जदार संजीव पाटोळे यांनी स्वतः काम पाहिले. पोलिस प्रशासनाच्या वतीने काही प्रकरणांमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरसे, संजय शिरसाठ, गणेश डोईफोडे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments