Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कचर्‍याबाबत योग्य उपाययोजना करुन शनिवारपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ करा :आ.जगताप


आ. संग्राम जगताप यांचे मनपा अधिकार्‍यांना बैठकीत निर्देश
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- शहरात दोन महिन्यांपासून कचर्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून त्यावर तातडीने उपाययोजना करुन शनिवार (दि.9) पर्यंत संपुर्ण शहर स्वच्छ करा असे निर्देश आ. संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.
कचर्‍याच्या प्रश्‍नासंदर्भात आ. जगताप यांनी सोमवारी (दि.4) सकाळी मनपा उपायुक्त प्रदिप पठारे, सुनील पवार यांच्यासह अधिकार्‍यांसमवेत शहरातील विविध भागात पाहणी केली त्यानंतर महापालिकेच्या जुन्या इमारतीत कचर्‍याच्या प्रश्‍नावर बैठक घेत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या.
निवडणूक काळात शहरात फिरत असताना कचर्‍याचा गंभीर प्रश्‍न पहायला मिळाला. कचरा रॅम्प बंद असल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला असला तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आ. जगताप यांनी प्रशासनाला सुनावले.
शहरातील कचरा संकलनाचे काम पुण्याच्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट संस्थेस देण्यात आले असून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. बुधवारी (दि.6) सकाळपासून सदर संस्था कचरा संकलनाचे काम सुरू करणार असल्याची माहिती यावेळी अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. कचरा संकलन संस्थेकडून सुरू झाल्यानंतर रिकामे झालेल्या मनपाच्या सफाई कामगारांकडून रस्ते, फुटपाथ आणि कॉलनी अंतर्गत स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. या स्वच्छतेच्या कामास आमदार, मनपाचे अधिकारी यांचे संयुक्त पथक अचानक भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे बैठकीत निश्‍चित करण्यात आले.
अधिकार्‍यांनी आपली महापालिका समजून काम करावे. इच्छाशक्ती कमी पडत असल्याने कचर्‍यासारखे प्रश्‍न निर्माण होतात. अधिकार्‍यांनी आपले शहर थ्री स्टार कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी आपले पूर्ण सहकार्य राहिल असे आ. जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपायुक्त पठारे, पवार, डॉ. अनिल बोरगे, परिमल निकम, प्रभाग अधिकारी, केअर टेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ...
तर अधिकार्‍यांना दालनात बसू देणार नाही
या बैठकीपुर्वी आ. जगताप यांनी महापालिकेला पत्र देऊन स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. या पत्रात आ. जगताप यांनी म्हटले आहे की, शहरात सद्यस्थितीत आरोग्य व दैनंदिन सुविधांचा प्रचंड अभाव जाणवत आहे. अनेक वसाहतीत रस्त्यावर कचरा पडलेला आहे. पावसात हा कचरा भिजून त्याची दुर्गंधी त्यात्या परिसरात पसरली आहे. तसेच अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने मच्छरांचा प्रार्दुभाव वाढल्यानेही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक परिसरात छोटे-मोठे साथीचे आजार वाढले आहे व शहरातील अनेक भागात डेंग्यु सदृश्य रुग्णही आढळून आलेले आहेत. ही परिस्थिती महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे योग्य नियोजन नसल्याने उद्भवलेली आहे.
तसेच अहमदनगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडल्याने महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे. तसेच पावसळ्यापूर्वी काय व कुठे रस्ते पॅचिंग व खड्डे बुजविले आहे. याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्याने जाणे-येणे ही मुश्कील झाले आहे. तसेच रोज हे खड्डे चुकवताना छोटे-मोठे अपघात घडत असल्याच्या घटनाही समोर येत आहे. तरी देखील मनपा प्रशासनाकडून याबाबत काही ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. मनपा प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले व रस्त्याने जाणे-येणेही मुश्कील झाले आहे.
येत्या दोन दिवसात मनपा प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्य, दैनंदिन सोयी-सुविधा, रस्ते दुरुस्तीबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या समवेत अभिनव पध्दतीने आंदोलन करून नगरकरांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अधिकार्‍यांना त्यांच्या दालनात बसू दिले जाणार नाही, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments