नगर रिपोर्टर
अहमदनगर - मुंबईवरून आलेल्या एलईडी रथाचे चालक व त्याच्या साथीदाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहरामध्ये असे कृत्य करत असून, नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रा.गाडे म्हणाले की, नगर शहरामध्ये शिवसेनेचा प्रचार चालू असताना आज (दि.14) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सावेडी नाका येथे राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी या गाडीवरील चालकास तसेच त्याच्या साथीदारास बेदम मारहाण केली. रवीसिंग इन्द्रपाल सिंह तसेच धीरेन्द्र कुमार या दोघांना मारहाण केली आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरे व गाडीचा नंबर आलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा तात्काळ तपास करावा, अशी मागणी गाडे यांनी केली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नगर येथे सभा होणार होती. सदरची सभा न होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी गांधी मैदान अगोदरच बुक केले. मात्र तेथे राष्ट्रवादीची एकही सभा झाली नाही. राष्ट्रवादीकडून खोडसाळपणा केला जात आहे. असाच प्रकार नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी केला जात असल्याचेही संभाजी कदम व बाळासाहेब बोराटे यांनी यावेळी सांगितले.
0 Comments