Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पावसाने श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात खरिपाचे मोठे नुकसान


नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीरामपूर- तालुक्याच्या पूर्व भागातील माळवाडगांव, भामाठाण, खानापूर, कमालपूर व मुठेवाडगांव परिसरात गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून दररोज सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने ग्रामीण भागातील दिवाळीवर नुकसानीचे सावट दिसत असल्याने शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करुन त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.
         परिसरात सर्वञ शेतात पाणीच पाणी दिसत आहे.काढणीला आलेल्या उभ्या पिकांना अंकुर फुटु लागले आहे.त्यातच दिवाळीची लगबग सुरू असतांनाच शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे त्यामुळे या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 
  
 गेल्या वर्षभरापासून कमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला त्यानंतर यावर्षीच्या जुनच्या सुरुवातीलाच कमी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कसरतीने खरिपाची पिके उभे केली.त्यावेळी सुरुवातीला पावसाने अंतर दिल्याने होणाऱ्या उत्पन्नात घट होतांना दिसत आहे.याच खरिपाच्या पिकावर शेतकऱ्यांची दिवाळी व पुढील रब्बीचा हंगाम अवलंबून आहे.परंतु या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व स्वप्नावर पाणी पडले आहे.दिवाळीचा सन दोन दिवसांवर आलेला असतांनाच पावसाची उघडीप होत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहे.
           गेल्या महिन्यात मका पिकावर लष्करी अळीने धुमाकूळ घातल्याने मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आता त्यानंतर दररोजच्या पावसाने सोंगणी केलेल्या तसेच उभे असलेल्या पिकांचे नुकसान सुरू केले आहे.सध्या परिसरात सोयाबीन व बाजरीचे काढणीचे काम जोरात सुरू झाले आणि पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.सोंगणी केलेली बाजरी व सोयाबीन शेतात पडुन असल्याने व दररोजच्या पावसाने सोंगणी केलेल्या बाजरी व सोयाबीनला मोड येऊ लागले आहे, तर बोंडअळीतुन वाचलेल्या कपाशीच्या फुटलेल्या बोंडांना आता पाणी लागल्याने कापसाचेही नुकसान होत आहे.
        तसेच दररोजच्या संततधार पावसामुळे जनावरांच्या मका व घास चाऱ्याचे नुकसान होत असून पशुधन देखील संकटात येण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे तसेच या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करुन झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

चौकट - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जिवन शेतीवरच अवलंबून आहे परंतु या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
 - बाबासाहेब पा चिडे सरपंच माळवाडगांव

चौकट - मोठ्या मुश्किलीने जगवलेली पिके डोळ्यासमोर सडत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देऊन शासनाने शेतकऱ्यांना आधार द्यावा. 
- गिरीधर पा आसने चेअरमन वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटी

Post a Comment

0 Comments