ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : दरेवाडी (ता.नगर) येथे महिलेचा खून करून मृतदेह घरासमोर पुरण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.2) सकाळी समोर आली आहे. या घटनेबाबत पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मयत महिलेच्या नातेवाईकांना अधिक चौकशीसाठी भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदणासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेने बुर्हाणनगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मयत महिलेचे राजनंदा महादेव आगाशे असे नाव आहे. चार वर्षापासून नांदेड या ठिकाणाहून कामासाठी आगाशे कुटुंब दरेवाडी येथे आले होते. मयत महिला ही भाजीपाल्याचा व्यवसाय करीत होती. घराच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांनी भिंगार कॅम्प पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी स.पो.नि. प्रविण पाटील, उप.नि.गायकवाड, देशमुख, कॉ.राजू सुद्रिक यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर दुर्गंधी येत असणार्या ठिकाणी खोदण्यात आल्यानंतर मयत राजनंदा या मयत महिलाचा मृतदेह आढळून आल्याचे समजते. या घटनेच्या चौकशीसाठी तातडीने मयत महिलेच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. याकारणास्तव पुढील तपासासाठी नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची पोलिसांनी गांभिर्याने दखल घेऊन मृत महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेणासाठी पाठविण्यात आला आहे.
0 Comments