Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील विधानसभा मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू


 आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता दि. 24 ऑक्टोबर 2019 रोजी  मतमोजणी  होणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बाराही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून दि.२४ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
     विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानुसार 216-अकोले (अ.ज) -‍पॉलीटेक्निक वर्कशॉप व कन्या विद्या मंदिर,अकोले,  217-संगमनेर-सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात, क्रिडा संकुल, संगमनेर 218-शिर्डी-तालुका मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, राहाता, 219-कोपरगाव-सेवानिकेतन कॉन्व्हेंट  स्कुल,  कोपरगाव, 220-श्रीरामपूर (अ.जा.) -मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,  तहसिल  कार्यालय, श्रीरामपूर, 221 नेवासा-नविन शासकीय धान्‍य गोडाऊन, सेंन्‍ट मेरी स्‍कुल रोड, (मुकिंदपुर) नेवासा, 222-शेवगाव-नविन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय शेवगाव, 223 राहुरी-लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला,शास्‍त्र व वाणीज्‍य महाविद्यालय, राहुरी, 224-पारनेर-राजर्षी शाहु महाराज सभागृह,  न्‍यु आर्टस कॉमर्स व सायन्‍स कॉलेज, पारनेर,  225-नगर-महाराष्‍ट्र राज्‍य वखार महामंडळ, गोडाऊन क्रमांक 4, नागापुर, अहमदनगर,  226-श्रीगोंदा-शायकीय धान्‍य गोडाऊन, पेडगाव रोड, श्रीगोंदा, 227-कर्जत-जामखेड  -(शासकीय गोडाऊन, नविन तहसिल कार्यालय, कर्जत येथे मतमोजणी होणार आहे.
     मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणीचे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्‍याची शक्‍यता गृहीत धरुन मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्‍यवस्‍था बाधित राखण्‍याच्‍या  दृष्‍टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्‍या कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार,कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मतमोजणी ठिकाणीपासुन 200 मीटर अंतराच्‍या आतील कोणत्‍याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्‍ये  निवडणूकीचे मतमोजणीसाठी नियुक्त सरकारी अधिकारी/ कर्मचारी,  उमेदवार व त्‍यांचा निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी तसेच भारत निवडणूक आयोगातर्फे परवानगी देण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍ती यांच्या व्‍यतिरिक्‍त इतरांना मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेशास मज्जाव असेल.  निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्‍या कामासंबंधी अहमदनगर जिल्‍ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी/सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्‍यक्‍ती व्‍यतिरिक्‍त  कोणासही पेन, मोबाईल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणच्या 200 मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही किंवा 200 मीटरच्‍या आतील परिसरात पी.सी.ओ.चालू ठेवणार नाही.
     कोणीही व्‍यक्‍ती शस्‍त्र, क्षेपक, काड्यांची पेटी, लायटर, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्‍तू,  वॉकी-टॉकी, कॉडलेस टेलिफोन, ज्‍वलनशील पदार्थ घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करणार नाहीत.  मतमोजणीचे ठिकाणा पासुन 200 मीटरच्‍या आत कोणत्‍याही पक्षाचे कार्यालय किंवा उमेदवाराचे कार्यालय उघडे राहणार नाही किंवा राजकीय होर्डींग, बॅनर, नोटीस फलक, झेंडे लावले जाणार नाहीत.  परवानगी देण्‍यात आलेल्‍या वाहना व्‍यतिरिक्‍त मतमोजणी केंद्रापासुन 200 मीटर परिसरात कुठलेही वाहन आणता येणार नाही.   निवडणूकीचा निकाल लागल्‍यानंतर अहमदनगर जिल्‍ह्याच्या महसुल स्‍थळसीमेच्‍या हद्दीत संबंधीत पोलीस अधिकारी यांची परवानगी घेतल्‍याशिवाय कोणासही मिरवणूक काढता येणार नाही.  तसेच,कोणीही निवडणूकीत पराभूत उमेदवाराच्‍या घराजवळ वा इतरत्र जमा होणार नाहीत व प्रक्षोभक घोषणा  देणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. हे आदेश दि.24/10/2019 रोजीचे 00.00 वाजता पासुन ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अथवा दि. 24/10/2019 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत ( यापैकी जे उशिरा असेल तो पर्यंत ) लागु राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments