Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

३७० कलम हटवल्यामुळे जम्मू-काश्मिर सुजलाम, सुफलाम होऊन शांतता नांदेल - इंद्रेशकुमार
नगर रिपोर्टर

अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडसी निर्णय घेत हे ३५ अ व ३७० कलम हटवले आहे. त्यामुळे काश्मिरी पंडित, शिया मुस्लिम, शिख हे नागरिक खुष आहेत. मात्र ज्यांची दुकानदारी चालू होती, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. या निर्णयामुळे भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू काश्मिर विकासाच्या पथावर येऊन सुजलाम, सुफलाम होऊन तेथे शांतता नांदेल. लाहोर शिवाय भारत अपूर्ण आहे, असा नारा आता आपण दिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केले. व्याख्यानमालेस उपस्थित असलेल्या नागरिकांकडून दोन्ही हात वर करुन 'मृत्यू झाला तर अखंड भारतातच झाला पाहिजे, लाहोरसह अखंड भारत झाला पाहिजे', असा संकल्प करुन घेतला.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेतर्फे दीनदयाळ व्याख्यानमाला समिती आयोजित चौथ्या व्याख्यानमालेचे उद्घाटन माऊली सभागृहात इंद्रेशकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष पोलिस महानिरिक्षक कृष्णप्रकाश, खासदार सुजय विखे, उपमहापौर मालन ढोणे, संघाचे प्रांतप्रमुख नानासाहेब जाधव आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी इंद्रेशकुमार यांनी 'काश्मिर काल, आज आणि उद्या' या विषयावर पहिले पुष्प गुंफले. पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, मानद सचिव विकास पाथरकर, व्याख्यानमाला समितीप्रमुख धनंजय तागडे, कार्याध्यक्ष सुहास मुळे उपस्थित होते.
इंद्रेशकुमार म्हणाले, भावनांचा उद्रेक झाल्यावर क्रांती जन्म घेते, त्यातुनच १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. काँग्रेसने भारतास स्वातंत्र्य मिळवून दिले, असे आपल्यावर बिंबवले गेले, मात्र हे खोटे आहे. काँग्रेसने भारतास स्वातंत्र्य नाही तर विभाजन दिले आहे. हे भारताचे सर्वात मोठे दुर्भाग्य. काँग्रेसचे संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमत होते. या बहुमताच्या जोरावर राष्ट्रपतींच्या सहीने ३५ अ व ३७० कलम आणून देशाचे पुन्हा एकदा विभाजन केले. एका देशात दोन निशान, दोन नागरिकत्व, दोन पंतप्रधान निर्माण केले. हा लोकशाहीचा सर्वात मोठा अपमान केला.
३७० व ३५ अ मुळे देशाचे किती नुकसान झाले, हे सर्वजण जाणतात. संघ परिवाराने या निर्णयाला विरोध केला. डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी यांनी लढा दिला तर त्यांना विषप्रयोग करुन मारले. पोलिस महानिरिक्षक कृष्णप्रकाश म्हणाले, बौद्धीक व मानसिकदृष्ट्या जनजागृती करणारी दीनदयाळ व्याख्यानमाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून वसंत लोढा मला या व्याख्यानमालाला पाचारण करत होते. मात्र यावर्षी योग आला. एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आल्याचे समाधान मला होत आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले जात आहेत, त्यामुळे व्याख्यानमालेच्या माध्यमातून संस्कृती जपण्याच्या काम होत आहे.
खा. सुजय विखे म्हणाले, इंद्रेशकुमार यांनी प्रभावीपणे काश्मिर व ३७० बद्दल विषय मांडला आहे. जेव्हा हे ३७० कलम हटवण्यासाठी संसदेत विधायक मांडले गेले. तेव्हा मी सदस्य म्हणून हजर असल्याचा अभिमान आहे. प्रास्तविकात वसंत लोढा म्हणाले, अर्थपुरवठा करण्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत, शहर विकासास चालना देत आहे. आता या संस्थेमार्फत 'दीनदयाळ परिवार' या नव्या संकल्पनेस या व्याख्यानमालेच्या उद्घाटनानिमित्त सुरुवात करत आहोत. दीनदयाळ परिवारात सर्व स्तरातील, जाती-धर्माचे व विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग असणार आहे.
व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमास दीनदयाळ पतसंस्थेचे संचालक नकुल चंदे, डॉ. ललिता देशपांडे, आर.डी.मंत्री, नरेंद्र श्रोत्री, निलेश लोढा, अनिल सबलोक, व्याख्यानमाला समितीचे मधुसूदन मुळे, दामोदर बठेजा, प्रा. सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, गौतम कराळे, आदि उपस्थित होते. पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे, सुखदेव दरेकर आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन शारदा होशिंग यांनी, तर आभार गौतम दीक्षित यांनी मानले.
Post a Comment

0 Comments