शेवगाव - तालुक्यातील बोधेगाव येथे गुरुवार (दि.27) दुपारी अडीज ते तीन वाजण्याच्या दरम्यान, इयत्ता 5 वीत शिकणारा रिहान सत्तार पठाण हा मुलगा काशी नदीवर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी नदीच्या डोहात बुडून मरण पावला. बोधेगाव आणि परिसरात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने श्री क्षेत्र काशी केदारेश्वर या ठिकाणाहून उगम पावणार्या काशी नदीला मोठा पुर आला होता. ही नदी गोळेगाव लाडजळगाववरून बोधेगाव हातगाव मार्गे मुंगीला गोदावरी नदीला मिळते. या नदीचे खोदाईकरण झाल्याने पुराचे पाणी त्यात साचून मोठमोठे खड्यांमध्ये पाण्याचे डोह झाले आहेत. बोधेगावच्या ग्रामसचिवालयाजवळील डोहामध्ये पोहण्यासाठी गेलेला रिहान याला पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पाणी गढूळ असल्याकारणाने त्याला बाहेर काढण्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा वेळ लागला. बोधेगावला गुरूवारचा आठवडाबाजार असतो. बाजार करण्यासाठी नागलवाडी येथील तरुण ऊसतोडणी कामगार अशोक एकनाथ ढाकणे याने गढूळ पाण्यात उडी घेऊन मृत रिहान पठाण यास बाहेर काढले. रिहान हा त्याच्या आई-वडिलाना एकटाच होता. त्याच्या या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments