गुरुवार दि.11
श्रीरामपूर – गुन्ह्यातील चार्टशिटमधून नाव वगळण्यासाठी पैशाची मागणी करणार्या पोलीस अधिकार्याला लाचलुचपत विभागाच्या कारवाईची माहिती मिळाल्याने त्यांनी लावलेला सापळा फसला. दरम्यान तक्रार केली म्हणून शहर पोलिसांनी आपणास धमकविल्याचा आरोप तक्रारदार विजय मकासरे यांनी केला आहे.
शहरातील इंदिरानगर येथील विजय अण्णासाहेब मकासरे ( रा. इंदिरानगर, श्रीरामपूर) यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माझ्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि 420 व इतर कलमान्वे गुन्हा दाखल आहे. यामध्ये मला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. परंतू संबंधित गुन्ह्यामध्ये फिर्यादीने स्व:त न्यायालयात हजर राहुन या गुन्ह्यामध्ये विजय मकासरे यांचा काहीही संबध नाही, असे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यामुळे त्या गुन्ह्यातील चार्जशिटमधून नाव वगळण्यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या एका कर्मचार्याने 2 हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी आपण लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवरून काल दुपारी लाचलुचपत विभागाचे डिवाएसपी श्री. खेडकर, कर्मचारी प्रशांत जाधव व इतर कर्मचार्यांनी पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. मी (मकासरे) व पंच यांनी शहर पोलीस ठाण्यात जावून याबाबत पोलीस कर्मचार्यांशी चर्चा केली. त्यानुसार बाहेर चहाच्या टपरीवर चर्चा करण्याचे ठरले. त्यापूर्वी मी माझी चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. चर्चा करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्याठिकाणी आला असता, त्याला सापळा लावल्याचे समजल्याने तो त्या ठिकाणाहून पळून गेला. या सापळ्याबाबत सदर कर्मचार्याने पोलीस अधिकार्याला सांगितले.
नंतर दुसरा पोलीस कर्मचारी माझ्या गाडीत बसला व गाडी पोलीस ठाण्यात घ्या, असे सांगू लागला. दरम्यान मी लाचलूचपत विभागाचे कर्मचारी प्रशांत जाधव यांना फोन लावून पोलीस कर्मचारी जबरदस्तीने गाडीत बसल्याचे सांगितले. त्यांनी गाडी बेलापूर पोलीस ठाण्यात आणा असे सांगितले, त्या दरम्यान शहर पोलिस ठाण्याच्या एका अधिकार्याने माझ्या गाडीचा खाजगी गाडीने पाठलाग करुन मला रस्त्यात अडविले. नंतर माझ्यावर सापळा लावतोस असे म्हणून अंगावर धावले. परंतू लाचलूचपतचे डिवायएसपी यांनी मध्ये पडून त्यांना दूर लोटले.
त्यानंतर मला घेवून ते बेलापूर पोलीस चौकीत आले. व त्या अधिकार्यालाही बोलावून घेतले. बेलापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व लाचलूचपतचे पथक यांच्यात चर्चा झाली नंतर हा प्रकार गैरसमजूतीमधून झाला आहे. आता आमचे मिटले असे प्रसार माध्यमांना सांगून पोलीस अधिकारी निघून गेले. परंतू सदर पोलीस अधिकारी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करु शकतो व माझ्या जीवितास धोका निर्माण करु शकतो, असे श्री. मकासरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments