Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्याबाजारात जाताना ग्रामस्थांनी पकडले


   
नगर रिपोर्टर टिम
बुधवार दि.10
हिंगोली -  पोषण आहार तसेच अंगणवाडीच्या बालकांना द्यावयाच्या अन्नधान्याचा हिंगोली जिल्ह्यामध्ये काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. वसमत तालुक्यातील सिरळी येथे जागरुक नागरिकांनी अंगणवाडीच्या मुलांना द्यायचे अन्नधान्य किराणा दुकानात विक्री होत असतांना पकडले. तसेच अन्नधान्य वाटण्यासाठी आलेला टेंम्पोही नागरिकांनी पकडला असून कुरुंदा पोलिसांनी हा टेंम्पो ताब्यात घेतला आहे. पंचायत समिती प्रशासनाला नागरिकांकडून तक्रार आल्यावर पत्र देऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे कुरुंदा पोलिसांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा कारभार ढेपाळला आहे. शिक्षण विभागा पाठोपाठ महिला बालकल्याण विभागाच्या प्रशासनाकडून देखील वादग्रस्त कारभार होत असल्याची चर्चा आहे. वसमत तालुक्यातील सिरळी या गावामध्ये एम.एच. 26 एडी 536 या क्रमांकाच्या टेंम्पोमधून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पोषण आहाराचे अन्नधान्य आणण्यात आले होते. या टेंम्पोमधून अन्नधान्याचे एक पोते किराणा दुकानात काळ्याबाजारात विक्रीसाठी नेत असतांना सिरळीच्या नागरिकांनी पाळत ठेवली. किराणा दुकानात पोषण आहाराच्या धान्याचे पोते. पोहचताच नागरिकांनी हे पोते ताब्यात घेतले. तसेच टेंम्पोही अडवून ठेवला. टेंम्पो चालक व हमाल हा प्रकार पाहून पसार झाले. नागरिकांनी अन्नधान्याने भरलेला टेंम्पो पकडत कुरुंदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सिरळी येथे येऊन पंचनामा केला. दरम्यान, हा टेंम्पो अन्नधान्यासह ताब्यात घेतला असून नागरिकांची तक्रार येणार असल्याचे कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव येरेकर यांनी ‘दैनिक सामना’शी बोलतांना सांगितले. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही येरेकर म्हणाले.

Post a Comment

0 Comments