Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हयात सातवी आर्थिक गणना लवकरच सुरु होणार

सीएससी-ई-गव्हर्नन्स मार्फत होणार आस्थापनांची गणना
अहमदनगर - केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून देशपातळीवर सातवी आर्थिक गणना राबविण्यात येत असून सदर गणनेचे काम केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत कॉमन सर्व्हिस सेंटर (सी. एस. सी.) ई-गव्हर्नन्स या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी दिनेश काळे यांनी दिली आहे. या गणनेद्वारे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील (विशेषत: असंघटित क्षेत्र) कार्यरत आस्थापनांची उद्योग / रोजगारनिर्मिती विषयक सुयोग्य धोरण निश्चिती करिता आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.
आर्थिक गणनेसाठी पर्यवेक्षक यांची नेमणूक सदर संस्थेकडून करण्यात आली असून नुकतेच जिल्हा परिषद, अहमदनगर येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षणादरम्यान सी. एस. सी. महाराष्ट्र प्रादेशिक प्रमुख लोकेश श्रीवास्तव, राष्ट्रीय नमुना पाहणी, पुणे क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी श्री. देशपांडे व श्री. देवेंद्रसिंग, कॉमन सर्व्हिस सेंटर, ई- गव्हर्नन्सचे जिल्हा समन्वयक श्री. मच्छिंद्र चितळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. देशपांडे यांनी सातवी आर्थिक गणनेतील संकल्पना, व्याख्या तसेच राष्ट्रीय ध्येयधोरण ठरविणेबाबत आर्थिक गणनेचे महत्व विषद केले. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरचे श्री. श्रीवास्तव व श्री. चितळे यांनी, आर्थिक गणनेचे मोबाईल ॲपव्दारे प्रत्यक्ष काम कसे करावे, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना माहिती दिली. तसेच क्षेत्रिय काम करतांना येणा-या अडचणींबाबत प्रशिक्षणार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. चितळे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
सदर गणनेकरिता प्रथमच ई-प्लॅटफॉर्मचा वापर होणार आहे. प्रगणक नियुक्तीचे काम पर्यवेक्षकांमार्फत हाती घेण्यात आले असून गणनेअंतर्गत नागरिकांनी विश्वसनीय व परिपूर्ण माहिती देऊन राष्ट्रीय कामात आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments