Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर आवश्यक - जिल्हाधिकारीअहमदनगर - राजर्षी  छत्रपती शाहू महाराज हे खर्‍या अर्थाने लोकराजा आणि तत्वज्ञ होते. लोककल्याणाचा त्यांनी कायम पुरस्कार केला आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी केली. आजच्या काळात त्यांच्या विचारांचा जागर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
 राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग यांच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, सहायक आयुक्त समाजकल्याण पांडुरंग वाबळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, व्याख्याते प्रा, सुधाकर शेलार, सहायक नियोजन अधिकारी दीपक दातीर, सामाजिक कार्यकर्ते दीपक अमृत, संध्या मेढे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
श्री. द्विवेदी म्हणाले, सामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून काम करणार्‍या राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. लोकांसाठी कार्य करणार्‍या अशा लोकपुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास आजच्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.
 प्रा. शेलार यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जीवनप्रवास उपस्थितांसमोरमांडला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे स्मरण या दिवशी करणे आवश्यक आहे. त्यांनी त्या काळी वैचारिक प्रबोधनाचा वारसा दिला. सर्वधर्मसमभावाची शिकवण केवळ सांगितली नाही, तर तो विचार अंमलात आणला. विद्यार्थ्यांनी वसतीगृह सुरु करणे असो की, मागासवर्गीय घटकांच्या उन्नतीसाठीचे निर्णय असो, त्यांनी परिणामांची पर्वा न करता सामाजिक न्यायाचे निर्णय घेतले, असे प्रा. शेलार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. वाबळे यांनी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  सॅम्युअल वाघमारे यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान, सोमेश्वरभारुड मंडळ, तरवडी यांनी भारुड सादर करुन जनजागरण केले.  कार्यक्रमासाठी विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्ग आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकारी -कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments