Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एमबीबीएसच्या दोन हजार जागा वाढणार

एमबीबीएसच्या दोन हजार जागा वाढणार

   मुंबई - राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या वर्षभरात एमबीबीएसच्या तब्बल दोन हजार जागा वाढतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत व्यक्त केला. त्याचबरोबर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागाही वाढवून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे यंदा मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यांनी सातत्याने आंदोलने केली. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत केला. त्याला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.
आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी आल्या. विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला ही बाब मान्य आहे. मात्र, पदव्युत्तर प्रवेशासाठी विद्यार्थी तसेच पालकांना विश्वासात घेऊन पारदर्शी आणि प्रामाणिक भूमिकेतून प्रयत्न करण्यात आल्याचे महाजन यांनी टकले यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना या वर्षी आरक्षणानुसार प्रवेश मिळावा यासाठी राज्य सरकारने न्यायालयात ताकदीने बाजू मांडली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार्‍या सुनावणीत सकारात्मक निकाल अपेक्षित आहे असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments